खानदेशची मुलुख मैदान तोफ, अंमळनेरचे माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन..
बापूंची एक आठवण:-
![]()

खानदेशची मुलुख मैदान तोफ, अंमळनेरचे माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन..
बापूंची एक आठवण:-
माझ्या “कायीमाय “अहिराणी भाषेतील कादंबरीचे लिखाण संपवून त्याचे डीटीपी चे काम सुरू होते. कादंबरी लिखाण आणि ते सुद्धा अहिराणी भाषेत म्हणजे खूपच मोठे काम होते .अहिराणी बोलणं सोपं असतं परंतु लिखाण आणि शब्द भांडार सुचत नाही .अशा परिस्थितीत कादंबरी लिखाण पूर्ण केल्यावर आता शेवट छपाईला टाकावे त्याच्या अगोदर कोणास वाचन करायला द्यावे? हा प्रश्न होता .त्याच वेळेस आठवले खानदेश ची मुलुख- मैदान तोफ, अहिराणीचे खंदे वक्ते, माननीय गुलाब बापू ..!बापूंची आठवण झाली. मनात प्रश्न होता .बापू हे लिखाण वाचतील का किंवा त्यांना हे लिखाण आवडेल की नाही ? असे एक ना दोन प्रश्न होते. पण बापूंना दाखविल्याशिवाय पर्याय नव्हता .जे काय होईल ते हो निर्णय घेतला. सन 2004 चे वर्षे होते.दिवाळीचे दिवस होते. भाऊबीज अवघ्या दोन दिवसांवर आली होती. अशात संध्याकाळच्या वेळेस मी हळूच बापूंच्या समोर उभा राहतो. कधी नव्हे ती संध्याकाळची वेळ असून सुद्धा बापू सभोवती गर्दी नव्हती .मला आश्चर्याच्या सुखद धक्का बसला .पण एक बरं वाटलं आज बापूंशी निवांत बोलता येईल.
” बापू हाई म्हणी अहिराणी कादंबरी ती तुम्ही वाचा आणि काही बदल सुचाडता येई ते सूचाडा. मी हातातील हस्तलिखित बापूना दिले.”
“आज मनी तब्येत काही बरोबर नाही. माले वाचाले आठ- 15 दिन लागथीन”
“बापू तुम्ही आरामशीर वाचा..” मी खुशीत होतो .माझ्या दृष्टीने बापू ,हे हस्तलिखित वाचनार ही मोठी गोष्ट होती . त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून मी लगेच उठून उभा राहिलो. तशा स्थितीत त्यांनी मला बसवले. मी म्हटले ,”बापू तुमची तब्येत बरी नाही.” “बस रे भो..!”
त्यांनी मला बसून घेतले .माझ्या लिखाणाविषयी चर्चा केली .नवीन कोणत्या विषयावर लिखाण सुरू आहे. वगैरे बारीकसारीक गोष्टीची चर्चा केली .वास्तविक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती सोबत ,साहित्य विषयी आपुलकीने ,ते सुद्धा स्वतः आजारी असताना चर्चा करतात हेच माझ्यासाठी विशेष होते .खर तर मला अशावेळी त्यांच्याजवळ बसावे असे वाटत नव्हते .कारण त्यांची तब्येत खरंच बरी नव्हती .चेहऱ्यावरचे त्यांचे भाव ते दर्शवित होते .मी भेट संपवून समाधानाने घराकडे निघालो.
दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती. पहाटे सहा वाजले होते. फोनची रिंग वाजली .मी झोपेत होतो. झोपेतच फोन उचलला-*
“मी गुलाब बापू बोलत.कोण बागुल से का..?”
‘हा बापू ..नमस्कार .’.मी डोळे चोळत बापुचा आवाज ओळखला.
“आगंम्हा 102 ताप होता .पण रात्र बारा वाजल्यापासून ते पहाटे चार पर्यंत, तुम्हनि अहिराणी कादंबरीन हस्तलिखित वाचन पुर कर .!तुमना से माले महत्वाने बोलणं से..!”
“बापू ,अंगात एवढा ताप होता तर आरामशीर वाचलंअसतं!” मला अपराधीपणासारखे वाटले.
“ते जाऊ दे .तुम्हीन कव्हय येतस ..?मनाकडे आठ वाजता येणार जाणार वाढतस. का आतेज येतच लगेच…? बापू आपल्याला आत्ताच बोलत आहे. मी तसाच उठतो.
” बापू मी दहा मिनिटात येतो.”
कसं तरी तोंडावर पाणी फिरवतो. सायकल काढून बापूल कडे निघतो. “बापू खरंच एवढी तब्येत खराब होती तर रातभर जागून हे हस्तलिखित वाचायची गरज नव्हती .हे एवढा अर्जंट काम नव्हतं.”
मी बोलतो.
” देख गड्या खरंच तू लिखेल कादंबरी चांगली से.तब्येत बरी नव्हती पण एकदा वाचायला सुरुवात करी आणि ओळ नि ओळ वाची काढी..”
बापू आजारी असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. त्या उत्साहात त्यांनी घरात दोन कॉफीची ऑर्डर दिली .रात्रभर मध्ये बापूंनी शब्द नि शब्द वाचला होता. काही ठिकाणी मराठी शब्द आले होते त्या ठिकाणी पर्यायी शब्द लिहुन ठेवले होते. किरकोळ चुकांची दुरुस्ती करून ठेवली होती .माझ्या दृष्टीने हा मोठा आश्चर्याच्या धक्का होता .ज्या गोष्टीला मी महिना -पंधरा दिवस लागेल असं समजत होतो ती गोष्ट बापूंनी मला रात्रीतून करून दिली होती.
‘माले असं वाटत, तू लिहेल कथा चांगली से. पण ह्या कादंबरीना शेवट तू बदलावी टाक..!”
बापूंची ऑर्डर सुटते.मी मात्र मनातून धास्तवतो. कारण ह्या कादंबरी चा शेवट दुंखांत होता. एका ग्रामीण भागातील सुखी समृद्ध कुटुंबाची वाताहत कशी होते? त्याचे चित्रण त्यात होते .शेवट बदलला तर या कादंबरीची मजा जाणार होती. शासनाच्या एखाद्या डॉक्युमेंटरी फिल्म सारखी ही कादंबरी वाटली असती. बापूंच्या दृष्टीने ते समाजकारणी व राजकारणी असल्यामुळे त्यांना शेवट चांगला गोड व्हावा. असे वाटण्यास त्यांना स्वभाविक होते. माझ्यापुढे क्षणभर प्रश्न पडला. मी त्यांच्याशी वेगळ्या विषयावर बोलणे सुरू केले.
“बापू.. तुम्ही पहिल्या वेळेस आमदाराच्या निवडणुकिला उभे राहिले तेव्हा किती खर्च केला होता?” माझा प्रश्न..मी केला.
“मी, आमदारासाठी उभा राहणार नव्हतो .खिशात दमडी नव्हती. मला लोकांनी उभे केले .निवडणूक निधी म्हणून साध्या बूट पॉलिश करणाऱ्या व्यक्तीपासून ते मिल कामगारापर्यंत सर्वांनी एक एक रुपया गोळा करून एक दिवसात बत्तीस हजार रुपये गोळा केले. त्यातले मला फक्त 26 हजार रुपये खर्च आला.”
” बापरे ..!म्हणजे एक आमदार पदासाठी उभा राहण्याच्या एकूण खर्च फक्त 26 हजार ..! आणि आता काय पोझिशन आहे ..?मी प्रश्न केला.”
बापू हळूच हसले.
आत्ताची गोष्ट करू नका .तो जगवाणी आणि पारोयाना ऐ टी पाटील या एमएलसी साठे एकमेकना विरोध मा उभा व्हतात .एक मतना किमान चार चार लाख रुप्या व्ह तात.”
“बापू ,राजकारणा मधील ही परिस्थिती तुम्ही बदलू शकता का?’
“देख गड्या हायी गोठ आते तरी शक्य वाटत नाही..”
बापु, जर हायी शक्य वाटत नाही तर ह्या कादंबरीना शेवट बदल करान बी शक्य नाही .बापू सत्य से तेच लिखेल से.”
माझ्या बोलल्या पुढे ते क्षणभर विचारात पडले .
“जाऊ दे ,तुले जसं वाटत तसं लिंख.’ बापूंनी क्षणात माझ्या लिखाणास मान्यता दिली .तेवढ्यात घरातून दोन कप घेऊन बापूंची नात आली .कॉफीचे घोट घेता घेता आजच्या परिस्थितीची खंत त्यांच्या बोलण्यातुन जाणवली .जुन्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणाचे किस्से त्यांनी रंगवून सांगितले. आणीबाणीच्या काळातील जुन्या आठवणी सांगितल्या . कायद्याचे, कोर्टाचे किस्से सांगितले .जवळजवळ एक तास चर्चा सुरू होती. चर्चा म्हणण्यापेक्षा बापू वक्ते होते आणि मी श्रोता होतो .पण बोलण्यातला जोश तोच ..हजारो लोकांसमोर बोलताना असतो तसाच होता. अंगातील आजारपण गळून पडले होते. रात्रभर जागरण करून सुद्धा चेहऱ्यावर जागरणाचा भाव नव्हता. मला मात्र उगाच एवढ्या मोठ्याला माणसाला आपण अंगात ताप असताना, प्रकृती बरी नसताना सुद्धा त्रास दिल्याबद्दल चा अपराधीपणा सारखे वाटत होते .पण बापू मात्र उत्साहात बोलत होते.
देख गड्या पुस्तक चांगलं वाटणं. आणि हातमां लेल काम पूरकरी उठाणं ,मनीसन रातभर पुस्तक हस्तलिखित वाचत बसनु.
बापूंच्या बोलण्यापुढे काय बोलावे..?
खरंच काही माणसं मोठी का होतात. याचे रहस्य मला त्यावेळी समजले. माझ्या मनातील अपराधीपणाच्या भावनेला ते हसत खेळत उत्तर देत होते. त्यांच बरोबर त्यांचे चेहऱ्यावर अहिराणी कादंबरी वाचल्याचे समाधान दिसत होते . जवळजवळ दीड तास होण्यात येतो. आता येणारे जाणारे येऊ लागतात. बापूंची बैठक गजबजू लागते .
मी मात्र दोन्ही हात जोडून बापूंना नमस्कार करून ,हातात अहिराणी कादंबरीचे प्रूफ घेऊन निघालो असतो.
बापूंची ,आपुलकीची थाप माझ्या पाठीवर पडल्याचा आभास मला होत होता.
गोकुळ बागूल
अमळनेर.
मो 9422276140

