आ. सत्यजीत तांबेंच्या बैठकीनंतर शिक्षण विभाग लागला कामाला
![]()
आ. सत्यजीत तांबेंच्या बैठकीनंतर शिक्षण विभाग लागला कामाला
- नाशिकमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागासंबंधी चर्चा
- शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांच्यासह बैठक
प्रतिनिधी,

आमदार म्हणून निवडून येण्याआधीपासूनच शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर काम करणाऱ्या सत्यजीत तांबे यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत नाशिकच्या विभागीय बोर्ड कार्यालयात शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांची भेट घेतली. या बैठकीत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित कामांसंदर्भात चर्चा झाली. ही कामं लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास आ. तांबे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित होते. यात प्रामुख्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिलांमधील फरक लवकर मिळावा, शिक्षक पदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनावर नियुक्त करण्याऐवजी तरुण शिक्षकांची नियुक्ती करावी, या माध्यमिक विभागातील प्रश्नांचा समावेश होता. तर, २०१७-१८ ते २०२२-२३ या दरम्यानच्या सीएचबी शिक्षकांना मान्यता देणं, कला शाखेसाठीच्या तुकडीतील विद्यार्थ्यांची कमाल संख्या निश्चित करणं, अंशत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले शालार्थ आयडी त्यांना देणं, आदी उच्च माध्यमिक विभागाच्या प्रश्नांवरही चर्चा झाली.
चौकटी
माध्यमिक विभागाचे प्रलंबित प्रश्न
- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिलांमधील फरक लवकर मिळावा
- शिक्षक पदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनावर नियुक्त करण्याऐवजी तरुण शिक्षकांची नियुक्ती करावी
- नवीन २० टक्के अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शाळा कॉलेजला शालार्थ आय.डी मिळण्यास विलंब होत आहे.
- मुख्याध्यापक पदोन्नतीच्या मान्यता त्वरीत मिळणेबाबत कार्यवाही करणे.
- विनाअनुदानित / अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांची अनुदानित शाळेत रिक्त जागेवर बदली बाबत असलेली स्थगिती उठविणे व बदलीस परवानगी देणे.
उच्च माध्यमिक विभागाचे प्रलंबित प्रश्न
- २०१७-१८ ते २०२२-२३ या दरम्यानच्या सीएचबी शिक्षकांना मान्यता देणं,
- कला शाखेसाठीच्या तुकडीतील विद्यार्थ्यांची कमाल संख्या निश्चित करणं
- अंशत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले शालार्थ आयडी त्यांना देणं
- खाजगी संस्थांना निवड व वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रस्ताव सादर करण्याचे पत्र देणे.
- जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्याच्या शिक्षकांच्या मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करणे.
- किमान दोन वर्षाचा खंड (दहावीनंतर) असलेल्या विद्यार्थ्यांनाच १७ नंबरसाठी प्रवेश देणे.
प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील

