देश स्वातंत्र्य झाला परंतु जनता नाही!!
![]()

देश स्वातंत्र्य झाला परंतु जनता नाही!!
भारत हा देश म्हटला म्हणजे आठवते येथील लोकशाही..साऱ्या विश्वात श्रेष्ठ भारताची राज्यघटना आहे. ज्या विद्वानाच्या कर कमळातील लेखणीचा अविष्कार होय. जागतिक विचारवंताच्या प्रतिभेचं सुंदर लेण म्हणजे ही राज्यघटना..मोठा दिव्य विचार ठेवून तयार केलेली ही अप्रतिम घटना ! स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले पण अद्याप आम्ही लोकशाहीतील मूल्य रुजवू शकलो नाही. कोणत्याच धर्माचा पगडा राज्यघटना लागू करतांना होवू नये म्हणून संविधानाच्या प्रस्तावनेत भारताचा कुणीही रहिवाशी हा कुणी हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई, जैन, बौध्द, फारशी नसून तो भारतीय आहे. धर्माने तो ओळखला न जाता भारतात राहणारा म्हणून भारतीयच असावा हा सर्वसमावेशक विचार घटनाकाराने दिला.
घटनेने दिले खूप पण आम्ही राबवू शकले नाही. घटनेने भारतीयत्व दिले आम्ही धर्म, जात, वर्ण यापलीकडे गेलो नाही. जातीय अंहकार वाढला होता त्यामुळे विशिष्ट वर्गाने स्वजातीला सर्वश्रेष्ठ मानून मनूस्मृती स्विकारलेली होती.संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या हक्काने शिक्षित झाले त्यामुळे ज्ञान ही प्राप्त करता येते त्यासाठी कोणत्या जातीत जन्मला याला महत्व राहिले नाही. अस्पृश्य जातीत बुध्दीवंत, विचारवंत निर्माण झाले. सर्वांना न्याय पाहिजे म्हणून आरक्षण आले. अन्यथा मुजोर घोडे वंचितांना जगू देत नव्हते. मी हिंदू पण मला मंदिरात प्रवेश नाही. घोड्यावरून अस्पृश्याची वरात नेता येत नाही. मग प्रश्न पडतो हिंदू नेमका कोण? घटनेने अधिकार दिला पण आम्ही आमच्याच माणसाचा द्वेष करतात. इतर धर्मातही न्याय मिळतो तर त्यात गरिब व श्रीमंत दरी दिसतेच ना! काहींचे श्रद्धास्थाने अलग धर्म एक एकमेकांत भेद का? तर श्रेष्ठ व कनिष्ठ विचार डोक्यात भिनलेला दिसतो.
असा भेद नको म्हणून संविधानाच्या अखत्यारित धर्मनिरपेक्षता दिली. समाजात वाद नको त्यात समानतेसाठी समाजवाद दिला..मानव केंद्रबिंदू ठेवूनच घटना तयार केली. आज मानवाला स्वातंत्र्याने जगता यावी म्हणूनच संविधानात कुणाची मक्तेदारी ठेवली नाही. स्वातंत्र्य मिळाले परंतु जनता बेजार आहे. इतर देशांना वाटेल वा किती समानता प्रदान करणारी घटना आहे जिथे लोकशाही नांदत असेल..परंतु तसे दिसत नाही..स्त्री ला न्याय मिळतांना दिसत नाही. दररोज बातमी असते ‘स्त्रीवर अत्याचार व अमानुष खून !’ मनुस्मृती ने लादलेले अत्याचार प्रत्यक्ष घडतांना दिसत आहेत. अजूनही आम्ही स्त्रीला अत्याचार व बलात्कारापासून आम्ही मुक्त करू शकलो नाही. एका जातीचा दुसऱ्या जातीवर अन्याय आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोच की?
भारतात विकासाच्या नावावर खाजगीकरण सुरू झाले हे बहुजनांना पुन्हा गुलाम करण्याचा, लाचार करण्याचा अजेंडा आहे. यात सर्व समाजाला न्याय मिळणार काय? जे लोक नोकरीतील आरक्षण पुर्ण करित नाही ते खाजगीकरणात वंचितांना संधी देतील काय? कमी पगार अनिश्चित नोकरीची शक्यता कामगाराला स्वातंत्र्य देइल काय? असे प्रश्न निर्माण होतात .शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही तिथे त्याला शेती काय परवडणार..मेहनत शेतकऱ्याची मालाचा फायदा व्यापारी घेतो. धान्य पिकविणारा गरिब अन धान्य न पिकविता व्यापारी श्रीमंत होतो मग शेतकरी माल ठरवू शकत नाही. सांगा कसा मुक्त होइल तो हया पीडेतून,कधी उगवेल त्याला स्वातंत्र्याची सकाळ?
न्याय, समता, बंधुता, समानता हे सर्व धाब्यावर बसवुन खऱ्या मुक्तीचा प्राणवायू अदयाप गवसला नाही. काही कामासाठी लोक सरकारी दालनात जातात त्यांना वेळोवेळी लाथाडले जाते. ज्या जनतेच्या सेवेसाठी हा वर्ग असतो तो लोकांना सतावतो. काय मिळतो गरिबाला न्याय? नैसर्गिक विनामूल्य मिळणारे पाणी व हवा व्यापारी विकू लागले. कोरोनात अनेक लोक ऑक्सिजन नसल्याने मेलेत. घटनेने आमदार, खासदार, मंत्री जनतेचे सेवक असतील असे म्हटले परंतु जाब विचारण्याचे जाऊ द्या साधे भेटता येत नाही. बऱ्याच देवस्थानात पैसे दिल्याशिवाय प्रवेश नाही तिथे सामान्य जाऊ शकेल का? प्रत्येकाला उपासना करण्याचा ह्क्क आम्ही हिरावुन टाकला. देवस्थानात विशिष्ठ लोकांची मक्तेदारी झाली. ते ठरवतील देवस्थानात कोणते कपडे घालून यावे. यामुळे मुक्त स्वातंत्र्य आम्हाला मिळणार आहे का? देशात अमाप संख्या सामान्य परिस्थितीत जगणारांची परंतु रेल्वेत सामान्य डबे कमी असतात. सामान्यांचा विचार का नाही करत..सारे जगणे महाग झाले मुक्त स्वातंत्र्याचा अभाव आहे.
पत्रकार
एस. एच. भवरे.

