परिवर्तनाची कविता:आता होऊन जाऊ द्या!
![]()


परिवर्तनाची कविता:आता होऊन जाऊ द्या!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारज्वालांनी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला चोहोबाजूंनी आग लागली. समग्र क्रांती
/परिवर्तनाची आंदोलने सर्वत्र उभी राहीली. या लढाईला गतीमान करण्यासाठी घराघरात बाबासाहेबांचे विचार पोहचवण्याची जबाबदारी दलित साहित्य प्रवाहाने समर्थपणे पेलली आहे.दलित कविता ही धारदार शस्त्रच आहे.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय या मुल्यांचा स्विकार करत दलित कविता ही परिवर्तनाची कविता झाली.अन्यायाला विरोध,विषमतेला नकार,अमानुषतेला ठोकर मारत ही कविता वाटचाल करीत आहे.
या वाटचालीत आता होऊन जाऊ द्या! हा समर्थ उद्गार लोकनाथ यशवंतच्या कवितेच्या रूपात तेजाचे लेणे ठरलेला आहे. लोकनाथ यशवंत हे दलित कवितेच्या क्षेत्रात अत्यंत लढाऊ असे सशक्त पान आहे. लोकनाथच्या कवितेनं इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेची गुलामगिरी नाकारलेली आहे.जीवन संघर्षात उठून उभे राहण्याची आणि दोन हात करण्याची तयारी असलेली लोकनाथची आशयगर्भ विचार कविता तप्त लाव्ह्यासारखी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लढवय्ये विचार हाच लोकनाथच्या कवितेचा भरभक्कम पाया आणि इमारतही आहे. *आता होऊन जाऊ द्या!* या निर्णायक मतावर लोकनाथची कविता ही ठामपणे घट्ट पाय रोवून विद्रोहाचे आकाश मिठीत घेते आहे.सामाजिक/आर्थिक/राजकीय या सा-या क्षेत्रातील विसंगतीची /अधोगतीची नोंद ही कविता तिव्रतेने घेते. समतेच्या लढाईत आता खाली मान घालून जगताच येणार नाही.बंद मुठी आवळल्याशिवाय आणि हातातले शस्त्र उगारल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.याची जाणीव *आता होऊन जाऊ द्या!* मधून सतत होत राहते.लोकनाथची लढाई ही केवळ प्रस्थापित व्यवस्थेशीच नाही तर ज्या समाजात लोकनाथ जगतो आहे.त्या समाजातल्या गद्यार घटकांशी देखील आहे.लाचारीचा निषेध ही कविता करते तर कधी गांडूपणालाही ती झोडपते आहे.आता काहीही होवो उठून उभे राहिलेच पाहिजे. ही भूमिका लोकनाथ एका वाक्यात मांडतो आहे.जोहाराचे सोंग करून जुल्मी व्यवस्थेच्या पोटात शिंग आरपार करण्याची भाषा उद्गारतो आहे. उपहासाचे,उपरोधाचे धारदार शस्त्र असलेली लोकनाथची कविता अंतर्मुख करणारी आहे. याचा प्रत्यय लोकनाथच्या *आता होऊन जाऊ द्या!* यात सर्वत्र येतो आहे. लोकनाच्या कवितेतील युद्ध हे असे आहे....
कशी तुमची लढाई
आणि कसा तुमचा विद्रोह?
रिकाम्याच बंदुका घेऊन
तुम्ही मैदानावर जायचे
आज मात्र मी काडतूस भरून
सावध जातो आहे
कसे ते लोक होते
मुठी आवळून घरात बसायचे!
आज माझ्या मागे
सगळे शस्त्र होऊन येत आहे
*** ***
मी एक डोळस म्होरक्या
मी सावध,माझे लोकही सावध
*** ***
तू बघतच रहा!
युद्धाला सुरूवात झालीय
*** *** प्रस्थापित जुल्मी व्यवस्थैशी लढा देण-या लोकनाथच्या कवितेबद्यल डॉ. गंगाधर पानतावणे म्हणतात " लोकनाथची कविता मनुष्यत्वाला मुल्य देणारी कविता आहे.ती प्रकाशगामी आहे. नव्या जगाचा वेध घेणारा हा कवी क्रांतीकारी सामाजिकता व सांस्कृतिकता यात रमणारा आहे. ह्या आशयघन प्रवासात कवी क्वचितही कुठे स्वतःला विसरला नाही. लोकनाथची कविता ही उद्याची प्रकाशयात्रा आहे"
आता होऊन जाऊ द्या!
ची ही धगधगती प्रकाशज्वाला अधिकच प्रज्वलित होते आहे. --- शशिकांत हिंगोणेकर ७२१८८९२१८६


- आता होऊन जाऊ द्या!
लोकनाथ यशवंत
९७३०२७५१५२
मुक्तछंद प्रकाशन
सुष्मा लोकनाथ रायपुरे
प्रथम समुह १जानेवारी१९८९
मूल्य–२५रुपये

