अमळनेर येथील डॉ.घनश्याम पाटील होणार “फ्लाईंग ऑफिसर” !
![]()

अमळनेर येथील डॉ.घनश्याम पाटील होणार “फ्लाईंग ऑफिसर” !
अमळनेर- येथील तांबेपुरा भागातील रहिवासी डॉ. घनश्याम नागराज पाटील यांनी एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. संपूर्ण भारतातून त्यांच्या सोबत १९९ युवा अधिकारी हे “फ्लाईंग ऑफिसर” म्हणून नियुक्त होणार आहेत. या घटनेमुळे डॉ.घनश्याम व त्यांचे वडील या दोघांचे सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सैन्य दलात अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी दरवर्षी “यूपीएससी”तर्फे “सीडीएस”, एनडीए या सारख्या परीक्षा घेतल्या जातात. त्याच काठिण्य पातळीवर आधारित एअर फोर्स मध्ये ही “एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट” च्या माध्यमातून उच्च अधिकारी निवडले जातात. विशेष म्हणजे या परीक्षेत दोन वेळा गुणवत्ता यादी तून जावे लागते. डॉ. घनश्याम पाटील यांच्यासह देशभरातील सुमारे सात लाखापेक्षाही जास्त उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यात “एसएसबी” साठी 50 हजार उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यातून सुमारे 300 उमेदवारांची निवड होऊन वैद्यकीय चाचण्याही घेण्यात आल्या. डॉ घनश्याम यांनी पहिल्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गुणवत्ता यादीतही आपलं वर्चस्व कायम राखत एअर फोर्स मध्ये “फ्लाईंग ऑफिसर” होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सध्या ते हैदराबाद- तेलंगणा येथील एअर फोर्स अकॅडमी मध्ये एक वर्षासाठी प्रशिक्षण घेत आहेत. डॉ. घनश्याम पाटील हा येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे प्रभारी कमांडन्ट तथा सुभेदार मेजर नागराज पाटील व कविता पाटील यांचा मुलगा आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान शिवशाही फाउंडेशन तर्फे डॉ. घनश्याम पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे वडील सुभेदार मेजर नागराज पाटील, आई कविता पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक एस ए बाविस्कर, उमेश काटे, जी पी हडपे, महेश बोरसे आदी उपस्थित होते.
अमळनेर- फ्लाईंग ऑफिसर डॉ. घनश्याम पाटील यांचा सत्कार करताना एसए बाविस्कर, उमेश काटे, जी पी हडपे शेजारी नागराज पाटील, कविता पाटील आदी

