जि.प.शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी” बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती “करावी.महाराष्ट्र फेडरेशन ची मागणी!
![]()
जि.प.शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी” बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती “करावी.महाराष्ट्र फेडरेशन ची मागणी!
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जि. प.शाळांमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदी जि. प./खाजगी अनुदानित शाळांतील 70 वर्षांच्या आतील सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात येत्या 15 दिवसात रू.20,000/- मानधनावर नियुक्ती करण्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी/सी.ई. ओ.यांना दि 7 जुलै 2023 च्या परिपत्रकाद्वारे आदेशीत केलेले आहे.या आदेशास महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)चा विरोध असून सदर निर्णय शासनाने विनाविलंब रद्द करावा किंवा सेवानिवृत्तांऐवजी “बेरोजगार युवकांना नियुक्ती” देण्याचे सुधारित आदेश प्रसृत करावे अशी मागणी महाराष्ट्र फेडरेशन करीत आहे.
मा.न्यायालयातील प्रलंबित अपिलांची साक्ष काढून सदर निर्णय राबविण्याचा शासनाचा सद्हेतू सिद्ध होत नाही.कारण रिक्त जागी ज्या पद्धतीने सेवानिवृत्तांची कंत्राटी पद्धतीने फेरनियुक्ती करण्यात मा.न्यायालयाची मान्यता गृहीत धरली जात आहे,त्याच पद्धतीने प्रशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना नियुक्ती देण्यास सामाजिक न्यायतत्त्वानुसार कोणतीही कायदेशीर अडचण दृष्टिपथास दिसत नाही.
राज्यातील प्रशिक्षित लाखो शिक्षक उमेदवार 2012 पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असतांना त्यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या सबबीखाली बायपास करून सेवेच्या संधीपासून वंचित ठेवणे सामाजिक व नैसर्गिक समानतेच्या तत्वाविरुद्धच आहे.
म्हणून
शासनाने दि.7 जुलै 2023 च्या परिपत्रकामध्ये “सेवानिवृत्तांमधून” ऐवजी “बेरोजगार प्रशिक्षित उमेदवारांमधून” अशी उपयुक्त सुधारणा करावी.अशी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)मागणी करीत आहे.
राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक या शासन आदेशास प्रतिसाद न देता 10/11 वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगार युवकांच्या पाठीशी उभे राहतील असा आम्हास विश्वास वाटतो.
शासन या विषयी गांभीर्य पूर्वक फेरनिर्णय घेईल या विश्वासासह…
धन्यवाद!
ज्ञानेश्वर कानडे,अध्यक्ष
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
पालघर
जुलै 11,2023(2.45 pm.)

