अमळनेरची शौर्यगाथा :
मराठी लाईव्ह न्युजचे अतिथी संपादक ,ज्येष्ठ साहित्यिक गोकुळ बागुल यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश….
![]()

: अमळनेरची शौर्यगाथा :
मित्रांनो, देशाचा प्रजासत्ताक दिवस असो अथवा स्वातंत्र्य दिवस असो या दिवशी भारतीय स्वातंत्र्य युद्धात हजारो भारतीय, इंग्रज गोळीबाराने शहीद झाले. लाखो गंभीर जखमी झाले .भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव सारखे तरुण फासावर गेलो. या अशा महान वीरांचे स्मरण आपण सर्व भारतीयांना होत असते. याशिवाय इंग्रज शासनाच्या अन्याय, अत्याचाराच्या परिसिमा इथेच थांबत नाही .त्याही पलीकडे या देशात जालीनवाला बाग घडले .चवरी- चौरा सारख्या पोलीस स्टेशन जाळण्याच्या घटना घडल्या. ज्यामुळे महात्मा गांधींनी आपलं आंदोलन मागे घेतले. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सारा भारत रस्त्यावर उतरला. स्वातंत्र्याचे हे आंदोलन हे एक प्रकारे जन आंदोलन झाले.
अशात आठ ऑगस्ट 1942 च्या रात्री , मुंबईच्या आजाद मैदानावर महात्मा गांधींनी आपल्या दिव्य- वाणीने साऱ्या भारतीयांचे लक्ष वेधले. इंग्रजांना भारतातून चालते व्हा..!
“चले जाव…” नारा दिला.
दोन शब्दाची ही ओळ असली तरी सारा देश पेटून उठला.
” करा किंवा मरा..!”
भारतीय जनतेला आदेश दिला. साऱ्या भारतीयांचे रक्तशहारले. जनता हातघाईवर आली.
“तुम्ही स्वतंत्र आहात..”
गांधीजी गरजले .भारतीय काँग्रेसचे सर्व लहान-मोठे नेत्यांना इंग्रज सरकारने गजाआड टाकले .आता नेतृत्व कोणी करावे ..?हा प्रश्नच पडला नाही कारण आमचे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले होते. जनता रस्त्यावर आली होती .क्रांतीयुग अवतरले होते..!
” अशात सारा देश पेटला आणि माझे अमळनेर शांत कसे..? “पूज्य साने गुरुजींचा संदेश डॉक्टर उत्तमराव पाटलांना आला.- आणि त्या क्षणी उठावाची तयारी सुरू झाली. संदेश पत्रके विद्यार्थी मार्फत व्यापारी, शेतकरी ,काम -करी लोकांपर्यंत पोचविले केले. विजेची लहर जनमानसात सळसळत होती .गजानन जोशी सारखा विद्यार्थी नेता ,जोडीला छोटा शिवाजी पाटील, दादू राजपूत ,विजया मर्चंट या विद्यार्थ्यांच्या बैठका घेतल्या गेल्या. विद्यार्थ्यांच्या मिरवणूकिने उठावाची सुरुवात झाली .मिरवणुकीचे रूपांतर मोर्चात झाले. अमळनेर शहरातील पंचक्रोशातील जनमानस मोर्चात सामील झाले. पोलिसांनी मोर्चा सुभाष चौकात अडवला .जबरदस्त लाठीमार झाली. विद्यार्थ्यांचे रक्त स़ांडले. पोलीस बळा पुढे मोर्चा सरकत नव्हता. मोर्चा उधळला गेला.
“मोर्चा उधळला गेला..?”
हे ऐकून डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या धर्मपत्नी लीलाताई पाटील संतापाने बेभान झाल्या .रात्रीच्या सभेसाठी त्या राखीव होत्या. त्यांनी हातात झेंडा घेऊन मिरवणुकीचे नेतृत्व केले .पांगलेला जनसागर परत एकवटला. सारे पुढे सरकल्याने पोलीस हातप्रभ झाले.हतबल झाले. महात्मा गांधींच्या जयघोष करीत जमावाने अमळनेर शहरात फेरी मारली. पोलिसांना मोर्चा अडवण्याची हिंमत झाली नाही .मोर्चात रात्रीच्या सभेची घोषणा झाली.
“स्वातंत्र्याचा हा आमचा तिरंगा झेंडा ..!घ्या शपथ …………।।।अमळनेर तालुक्यातील इंग्रज सत्ता उधळायची…! देश पेटला.. अमळनेर शांत का ..?”पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी ही धर्मभूमी आहे …! ‘ मरू किंवा देश आजाद करू. “त्यांच्या बोलण्याने लोकांना उधाण आले. त्यात प्रथम पोस्ट ऑफिस पेटवण्यात आले .कोर्टाच्या भिंती च्या कंपाऊंडच्या भिंतीवर डॉक्टर उत्तमराव पाटील उभे राहून बोलू लागले-
“मानवी हत्या करायची नाही. इंग्रज सरकारची सर्व सत्तास्थाने भस्म करायची ..आपला तिरंगा कचेरीवर फडकून अमळनेर स्वातंत्र करायचे..! महात्मा गांधींनी सांगितले आहे, ” तुम्ही स्वतःच आहात ” डॉक्टर उत्तमराव पाटलांच्या बोलण्याने जमावला चेव आला. जमवाने कोर्टाची होळी करून जमाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला होता .रेल्वे स्टेशनच्या ज्वालांनी काळोखात अंमळनेर शहर उजळून निघाले .त्यानंतर जमाव कचेरीच्या दिशेने निघाला.
इथे मात्र पोलीस दबा धरून बसले होते. गोळी बार झाला. रंगराव देशमुख यांचा गडी बळीराम यास गोळी लागली ।गडी पालथा पडला. जमाव पांगला. पोलिसांनी पुन्हा फैरी झाडल्या.
हे असे सबंध महाराष्ट्रात कुठेच घडले नाही. इंग्रज शासन चवताळून उठले. दडपशाहीच्या कहर झाला. अमळनेर शहरात मार्शल लाँ लागू झाला. तो तोडण्यासाठी लीलाताई पाटील सज्ज झाल्या.
सकाळी सकाळी परब कॉटन मार्केट सेक्रेटरी, यांची बहीण व इतर चार सहा मुली सहित लीलाताई पाटील हातात तिरंगा घेऊन बाहेर पडल्या.
“नही रखनी.. नही रखनी.. ये जालीम सरकार नही रखनी…!
अशा घोषणा देत ही छोटी मिरवणूक इंग्रज सरकारच्या मार्शल लाँ च्या विरोधात गल्लीबोळातून पोलिसांना चकवीत अमळनेरच्या लालबागच्या उघड्या मैदानावर आली. सोबतीला लीलाताई पाटील यांचे दिर दशरथ नाना झेंडा हातात घेऊन हजर झाले .समोरून पोलीस आले. स्त्रियांच्या मोर्चा कसा आडवावा. ते संभ्रमात पडले. तोच गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या हुकूम सुटला-
“खेचो झेंडा ..।लगाव दंडा..
पोलिसांनी लीलाताई पाटलांच्या हातातील झेंडा खेचण्याच्या प्रयत्न केला .दशरथ नानावर लाट्या काट्या बरसल्या. लहान मुली जीव घेऊन पळाल्या. तोच बंदुकीचा दस्ता लीलाताई पाटलांच्या कमरेवर बसला. त्या खाली पडल्या.।
” ऑगस्ट क्रांती जिंदाबाद..! इंग्रज सरकार मुर्दाबाद..”
दशरथ नाना जोरात ओरडले. लीलाताई पाटलांना जोराने आदळून पोलीस गाडीत टाकण्यात आले. ऑगस्ट क्रांतीच्या होम कुंडात हजारो भारतीय शहीद झाले .काहींचे संसार उध्वस्त झाले .त्यात ही अंमळनेरची शौर्य गाथा आहे । खरंच हे भारतीय स्वातंत्र्य युद्धातील एक सोनेरी पान आहे…!
त्यामुळेच अमळनेर शहराने मार्शल लाँ तोडला म्हणून चवताळलेल्या ब्रिटिश हुकूमताने एक फरमान काढले. संबंध भारतात घडले नाही अशी ती घटना अमळनेरात घडली..
अमळनेर शहराला दीड लाखाचा असा सामूहिक दंड फुकारण्यात आला.
खरंतर इंग्रज शासनाचा हा दीड लाखाच्या सामूहिक दंड हा अमळनेर शहरातील प्रत्येक नागरिकाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याची पावती नव्हे काय…?
साहित्यिक गोकुळ बागुल अमळनेर.
मो.9422276140
संदर्भ: क्रांतीपर्व
डॉ. उत्तमराव पाटील

