राजू बावस्करांचे
काळ्या निळ्यारेषा
![]()
राजू बावस्करांचे
काळ्या निळ्यारेषा
हे पारंपरिक आत्मकथन नाही. सभोवतालच्या व्यक्तींची व्यक्तीचित्रणं आहेत. तराळ-अंतराळ,बलुतं ,अक्करमाशी,उपरा ,मु. पो. देवाचे गोठणे,
आयदान ,आठवणींचे पक्षी,मह्या जल्माची चित्तरकथा,
आभरान,ऐरणीच्या घना,ढोर,काळे पाणी ही आत्मकथने आहेत. राजूचे हे पुस्तक वाचल्यानंतर माझे त्याच्याशी बोलणे झालेय. आत्मकथन +सभोवतालची राजूच्या आयुष्यातील भेटलेली त्याच्या आयुष्याला वळण देणारी माणसे यात ते जिवंत असे पर्यंत उभी केलेली आहेत.दलित आत्मकथनांनी आंबेडकरी विचार स्विकार करुन सामाजिक समतेची लढाई लढून प्रस्थापित मराठी कांदबरी आणि आत्मचरित्रालाच छेद दिलाय. आठवणींच्या पक्षी सारखेच हे अनुभव कथन राजूने खूप आंतरिक तळमळीने रेखाटलेले आहे. यात शंकाच नाही.दहावी पर्यंतचा आयुष्याचा लेखाजोखा यात आहे. आंबेडकरांचा विद्रोही विचारांचा हलकासा स्पर्श आहे. खरे तर यापुढील लेखन हे त्याच्या आयुष्याचा संघर्ष असणार आहे. दलित आत्मकथनाच्या चौथ्या पिढीचे हे लेखन आहे. कालपर्यंत जो संघर्ष होता तसा तो आज राहिलेला नाहीय. त्याचे स्वरुप बदलले आहे. नवा छुपा जातीयवाद कालपेक्षाही आज छळतोय. नव्या पिढीच्या वाट्याला नवी छळव्यवस्था आलीय. कालचे व्यवस्थेचे छळकरी वेगळे होते. ग्रामीण भागात दलितांना छळणारे कोण होते?आजही छळणारे कोण आहेत?हे जाणून घेतले पाहिजे. सनातनी जी सामाजिक व्यवस्था आहे. जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे संपवली आहे. परंतु आजही ती व्यवस्था चेहरे बदलून आहे. तिला स्पर्शाचा विटाळ नाही. तिला दलित-मागासलेल्या बहुजन समाजाच्या प्रगतीचा प्रचंड दुःस्वास आहे. या दुःस्वासाविरुद्ध पुन्हा कालची लढाई लढावी लागणार आहेच.या देशाची राज्यघटना ही प्रथम पवित्र आहे. भारत देशाचे आपण स्वतंत्र नागरिक आहोतच. परंतु हे स्वातंत्र्य अजून सगळ्यांच्या वाट्याला आलेले नाही. बहुजनांची पहिली पिढी शिक्षणामुळे पुढे येते आहे. म्हणूनच आरक्षणा विरुद्ध वातावरण देशात उभ्या केले जात आहे. मंडल आयोग लागू करणा-या व्हि. पी. सिंहाना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. घटनेने नोकरी,आणि शिक्षणातले आरक्षण जोपर्यंत जातीव्यवस्था आहे. तोपर्यंत दिलेले आहे.राजकीय आरक्षण दर दहा वर्षांनी वाढवले जातेय. या आरक्षित जागेवर पंच्चाहत्तर वर्षे झालीत जे निवडून येणारे राजकीय प्रतिनिधी कुणाचे प्रतिनिधित्व करतात.तर ते त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. ते मागास समाजाचे नेतृत्व करणारे असते तर हे राजकीय आरक्षण दरवेळी वाढवावे लागले नसते. या आरक्षणाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहा वर्षाची मुदत दिली होती. पहिल्या दहा वर्षात मागास समाजाची प्रगती खरे तर व्हायला हवी होती. ती कुठल्याही पक्षाच्या सरकारने खरंच पूर्ण केली आहे का?याचे आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करायला हवे. भारत जोडो ऐवजी जाती मोडो असे आंदोलन जर कुणी केले तर प्रत्येक भारतीयाने स्वागतासाठी पुढे यायलाच हवे. तरच हा देश सारे जहांँसे अच्छा निश्चितच होईल. काळ्या निळ्या रेषांचे स्वागत आहे.तसेच राजूच्या या पुढील लेखनाला मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!
शशिकांत हिंगोणेकर साहित्यिक जळगांव


