1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिनी माईंच्या वंशजांची सत्यशोधक समाज संघ पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिनी माईंच्या वंशजांची सत्यशोधक समाज संघ पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

सावित्रीमाईंच्या चौथ्या वंशज जिजाबाई नेवसे यांची अविस्मरणीय भेट ]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला माईंच्या जन्मगावी नायगाव ( तालुका खंडाळा , जिल्हा सातारा ) येथे सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सत्यशोधक कार्यकर्त्यांनी वंशजांची ३ जानेवारी २०२३ रोजी भेट घेतली.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला भेट देऊन कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले व त्यांच्या स्मृती संग्रहालयातील सावित्रीमाईंच्या वापरातील जतन केलेल्या स्मृतीशेष दुर्मिळ जीवनोपयोगी साहित्याचे अवलोकन केले. महिलांना परंपरेच्या बेडयातून मुक्त करीत स्वातंत्र्य व समतेचे बीजारोपण करून महिलांच्या कर्तृत्वाला सर्व क्षेत्रात हक्क व न्याय मिळवून दिल्याचा प्रत्यय तसेच क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या युगप्रवर्तक कार्याची महती मानवंदना देण्यासाठी अलोट जनसागरात प्रतिबिंबीत झाली होती !
क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे बंधू सिदूजी खंडोजी नेवसे यांच्या पणतू सून गं.भा. जिजाबाई रघुनाथ नेवसे ( चौथ्या वंशज – वय वर्षे १०३ ) यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी आदरपूर्वक नतमस्तक होत चरणस्पर्श करून शुभाशिर्वाद घेतले.माईंच्या चौथ्या वंशज जिजाबाई नेवसे यांना अरविंद खैरनार,भगवान रोकडे ,कैलास जाधव , विजय लुल्हे यांनी सत्यशोधक समाज संघ निर्मित दिनदर्शिका – सन २०२३ सादर भेट दिली.१०३ वर्षाच्या आजींनी बिगर चष्म्याने दिनदर्शिकेचे चक्क वाचन करून आश्चर्यचकित केले !
राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांनी सत्यशोधक समाजाला उर्जितावस्था देण्याची विचारमंथनातून सांगितली रुपरेषा
या ऐतिहासिक भेटीत राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांनी सावित्रीबाईंच्या वंशज डॉ.नूतन लोणकर नेवसे यांच्याशी सांगोपांग चर्चा करून आजतागायतच्या वंशजांची आस्थेने विचारपुस केली.सत्यशोधक संघ स्थापनेतून सत्यशोधकी कार्याला उर्जितावस्था देण्याचा संकल्प व उद्दिष्टे याबाबत माहिती दिली.यावेळी डॉ.नुतन मॅडम यांच्या मावशी तिलोत्तमा जगताप, कमल ताम्हाणे उपस्थित होत्या.
स्मारक प्रांगणात दिनदर्शिका विक्री करतांना कार्यकर्त्यांनी केले प्रबोधन व सामुहिक ओवी गायन
यानंतर कार्यकर्त्यांनी राजकिय कार्यक्रमाला फाटा देऊन संघनिष्ठा व कर्तव्यभावनेने सावित्रीमाईंच्या स्मारकाजवळ दर्शनार्थी आबालवृद्धांना सत्यशोधक समाजाच्या दिनदर्शिकेचे महत्व सांगून लक्ष वेधले.सत्यशोधक समाजाचा इतिहास व कट्टर सनातनी ब्राह्मणांनी केलेल्या धार्मिक व आर्थिक शोषणाच्या विरोधातील पुरोगामी विधायक संघर्षाच्या चळवळीच्या प्रेरक माहीतीने फुले प्रेमी भारावल्याने अक्षरक्षः खरेदी करणारांची झुंबड उडाली ! निव्वळ अर्ध्या तासात ५०० दिनदर्शिका हातोहात संपल्या !! विशेषतः वैयक्तिक दिनदर्शिका न घेता बहुसंख्य ग्राहकांनी सप्रेम भेटीसाठी जादा विकत घेतल्या.दिनदर्शीकेतून सामान्य फुले प्रेमी व महाराष्ट्रातील तमाम बहुजनांपर्यंत सत्यशोधक समाजाने बहुजनांच्या समाजोन्नतीचे ऐतिहासिक कार्य पोहोचवले या समाजप्रबोधन कार्याची दखल सम्यक क्रांती पोर्टल चँनेल टिमने घेऊन राज्याध्यक्ष अरविंद खैरनार व विधीकर्ते भीमराव कोथिंबीरे यांची लाईव्ह मुलाखत घेतली.
डॉ.नुतन लोणकर – नेवसे यांनी केले आदरतिथ्य
डॉ.नुतन लोणकर नेवसे यांनी कार्यकर्त्यांना आग्रहाने घरी नेऊन सन्मानपूर्वक आदरतिथ्य केले.याप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगावचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी महाराष्ट्र शासनाचा ” थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले ” राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध बालसाहित्यिका माया धुप्पड यांच्या एकूण १७ पुस्तकांची अनमोल भेट डॉ.नुतन लोणकर नेवसे व यजमान अशोक बबन नेवसे उभयतांना धुप्पड मॅडम तर्फे सादर ग्रंथभेट दिली.
नायगावच्या सार्वजनिक ग्रंथालयासाठी सौ.माया धुप्पड लिखित बाल साहित्याची ग्रंथभेट
विजय लुल्हे यांनी नायगाव गावातील सार्वजनिक ग्रंथालयास देण्यासाठी माया धुप्पड लिखित दर्जेदार पुस्तकांचा नजराणा शिक्षिका हेमलता नेवसे यांच्याकडे सुपूर्द केला.
डॉ.नुतन नेवसे रंगल्या महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी साहित्य लेखन चर्चेत
डॉ.नुतन नेवसे या ” महात्मा जोतिराव फुल्यांवर आधारित चरित्रात्मक कादंबर्‍यांचे सामाजिक आणि वाड्मयीन आकलन ” या विषयानुषंगे प्रबंध सादर करून विद्या वाचस्पती झाल्या त्या अनुषंगाने कवी विजय लुल्हे यांनी त्यांच्याशी साहित्यिक वाटचालीबाबत मुलाखतीपर सांगोपांग चर्चा केली.चर्चेनंतर डॉ.नुतन लोणकर नेवसे यांनी स्वलिखित ग्रंथ – ‘ मराठी चरित्रात्मक कादंबरीतील महात्मा फुले ‘ व संपादित ‘ युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले ‘ ग्रंथसंपदा सत्यशोधक संघाच्या ग्रंथालयासाठी राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांना सादर भेट दिली.याप्रसंगी डॉ.नुतन यांचे सासरे बबन नेवसे व आत्माराम नेवसे आणि प्रताप रघुनाथ नेवसे कुटूंबियांसह जेष्ठ कार्यकर्ते जयप्रकाश शित्रे (औरंगाबाद ),विधीकर्ते भीमराव कोथिंबीरे (श्रीगोंदा), विधीकर्ते भगवान रोकडे व कैलास जाधव (चाळीसगाव), रामचंद्र भागवत (पाटस), सचिन नेमाणे (नेवासा) कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *