1 min read

उद्या जळगाव येथे समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक व सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा

Loading

👉प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस व शिक्षण विभागातील मान्यवरांची उपस्थिती
………………………………………….

✒️उद्या जळगाव येथे समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक व सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद प्रतिवर्षी 28 नोव्हेंबर क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले स्मृतिदिवस प्रित्यर्थ जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार जाहीर करीत असते. यावर्षी जिल्हास्तरीय 28 गुणवंत शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला असून राज्यस्तरीय सहा शिक्षकांना पुरस्कार जाहीर झालेला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा 25 डिसेंबर रोजी पं. नं. लुंकड विद्यालय जळगाव येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डि. के. अहिरे अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. प्रसिद्ध साहित्यिक, 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील मान्यवरांमध्ये डॉक्टर डी. बी. साळुंखे, डॉक्टर चंद्रकांत साळुंखे, प्रा. धम्मरत्न वायवाळ, शैलेश पाटील, जळगाव येथील साहित्यिक जयसिंग वाघ, शिक्षण विभागातील मान्यवरांमध्ये गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, रविकिरण बिऱ्हाडे, आर. डी. महाजन, अशोक बिऱ्हाडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संघटनेचे प्राथमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड व अन्य राज्य, विभाग आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून धनराज मोतीराय आण्णा असून ‘वंचितांचे शिक्षण आणि शिक्षकाची भूमिका’ या विषयावर ते विचार व्यक्त करणार आहेत. समता शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशना संदर्भात भूमिका संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ मांडणार आहेत.
सत्य शोधक चळवळीला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने दोन राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार सुद्धा संघटनेमार्फत यावेळेस दिले जाणार आहेत. सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार तसेच जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे यांना या वर्षाचा सत्यशोधक पुरस्कार संघटनेमार्फत दिला जाणार आहे.
लेखिका वर्षा अहिरराव लिखित ‘निबंधवर्षा’ आणि ‘पोयट्री अँड पोयटिक डिव्हाइसेस’ या पुस्तकांचा तसेच गंगापूर, औरंगाबाद येथील शिक्षक प्रशांत बारी यांच्या ‘तान्हूले तू आलीस खरी….’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन संघटनेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे, पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा देशमुख, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रदीप सुरवाडकर, प्राथमिक पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शैलेश शिरसाठ व खान्देश विभागाचे अध्यक्ष बी. एन. पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *