युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे : निवृत्त प्राचार्य एस. एस.राणे* [ सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२६ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ]
![]()
*युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे : निवृत्त प्राचार्य एस. एस.राणे*
[ सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२६ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ]
जळगांव प्रतिनिधी
” युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे कारण सत्य सोडून जगात सर्व चालू आहे ! डोळस होऊन तरुणांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे ; सत्यधर्माचा अजेंडा असला पाहिजे ” असे प्रतिपादन एस.एस.राणे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात केले. सत्यधर्म दिनदर्शिका – २०२६ प्रकाशन सोहळा विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगाव येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनाच्या औचित्याने शनिवार दि .२८ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एस.राणे ( संस्थापक अध्यक्ष , विद्यार्थी सहाय्यक समिती ) असून विचार मंचावर प्रमुख अतिथी प्रा. ज्ञानेश्वर धुमाळ ( सहाय्यक प्रा.एस.एस. मणियार विधी महविद्यालय ) , साहेबराव पाटील ( माजी उपाध्यक्ष , कनिष्ठ अभियंता संघटना म .रा. ) , राहुल भारुडे सर , विजय लुल्हे ( जिल्हा समन्वयक, सत्यशोधक समाज संघ ) उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळयास माल्यार्पण करण्यात आले.
प्रस्तावनेत संयोजक विजय लुल्हे म्हणाले की ‘ सत्यशोधक समाजाची दिनदर्शिका पुरोगामी विचारांची मार्गदर्शक असून कृषी संस्कृतीचे सण,परंपरांचे महत्व स्पष्ट करते. कर्मकांडातील फोलपणा दाखवून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करते. सत्यशोधक समाजाला जनमानसात रुजवून इंग्रजांच्या धर्म व जातीभेद वाढविणाऱ्या कुट राजनितीला शह देणाऱ्या समाज सुधारकांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांची माहिती देते. संघटनेची उद्दिष्ट्ये निहाय वाटचाल अर्थात राज्य अधिवेशने, संघटने मार्फत प्रकाशित पुस्तके, कार्यकर्त्यांची विभागीय प्रशिक्षणे, सत्यशोधक विवाह लावणारे राज्यातील विधीकर्ते, समाज परिवर्तनशील कृती कार्यक्रमांची माहिती देते. ] प्रा. ज्ञानेश्वर धुमाळ ‘ सत्यशोधक समाज व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रेरणानुबंध ‘ या विषयान्वये मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ” महात्मा फुले यांनी देव व त्यांच्या कलोकल्पीत अवतारांचे लोकांच्या मनावरील गारूड पहिल्यांदा उतरविले ! समस्त जातिधर्मियांना पूजाविधीचे कायदेशीर अधिकार मिळवून दिले. ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ ग्रंथातून धार्मिक विधींना पर्याय दिले … पूर्वापार असलेली देवाला प्रश्न विचारण्याची परंपरा अधिक टोकदार केली … शोषण करणाऱ्या परंपरा नाकारल्या ; वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवून पुरोगामी समाज निर्मितीचा पाया घातला. अभियंता साहेबराव पाटिल यांनी महापुरुषांची जयंती तथा पुण्यतिथी का साजरी करतात याबाबत सखोल मार्गदर्शन करून वाचनाचे महत्व सांगितले. राहुल भारूडे सरांनी विद्यार्थ्यांना आदर्शांचं प्रदूषण कसे होते सांगून विद्यार्थ्याना बोलते करुन अनौपचारिक सुसंवाद साधला.
———————————–
*विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विजय लुल्हे यांचे ग्रंथदान व फलक भेट : -* महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन व सामितीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या संयुक्त औचित्याने –
१ ) परिपूर्ण मराठी व्याकरण : बाळासाहेब शिंदे २ ) पांढरा घोडा पोलिस भरती प्रश्नसंच : विठ्ठल बडे ३ ) ययाती : वि. स. खांडेकर ४ ) आत्मस्वर : सुनिलकुमार लवटे ५ ) महात्मा जोतिराव फुले यांचे वैचारिक चरीत्र : डॉ.सदानंद मोरे ६ ) भारताचे संविधान : डॉ. बाबासाहेब त्रिंबक मोताळे
ह्या स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि साहित्यिक दर्जेदार पुस्तकांसह कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रेरणादायी सुविचार लेखनासाठी २ x ३ फुटचा ग्रीन बोर्ड समितीचे अध्यक्ष मा.एस.एस. राणे यांचेकडे सविनय सादर केला.
———————————–
कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक समाज संघ जळगाव यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर सानप आणि आभार प्रदर्शन महेश शिंपी सर ( क्रियाशील अर्ध्वव्यू भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी )
यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वस्तीगृह प्रशासक प्रविण सोनवणे सर, ग्रंथपाल मिनाताई पाटील, विद्यार्थी अतुल बारी, पवन मराठे, ऋषिकेश शिंपी यांनी अमूल्य सहकार्य केले. सामुहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

