मुंडगावचे संत बायजाबाई अद्यावत ग्रंथालय* *”गाव खेड्यासाठी वरदान*
![]()
*मुंडगावचे संत बायजाबाई अद्यावत ग्रंथालय*
*”गाव खेड्यासाठी वरदान*
श्री गजानन महाराजांच्या पवित्र चरण पादुका व काही काळ वास्तव्याने पुनीत झालेले श्री गजानन महाराज पादुका संस्थान द्वारा स्थापीत.
“संत बायजाबाई अद्यावत ग्रंथालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे.
संत नगरी मुंडगाव हे अधिकाऱ्यांचे गाव व्हावे आपल्या गावाची ओळख अधिकाऱ्यांचे गाव म्हणून व्हावे या प्रेरणेतून श्री गजानन महाराज पादुका संस्थानच्या विश्वस्त मंडळांनी आपल्या गावात अद्यावत ग्रंथालय स्थापन करावे अशी संकल्पना मनात आणली उत्तम ज्ञानामृत देणारी पुस्तके आपले आयुष्य घडवतात आणि तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलवतात.
गावातील मुलांनी स्वअध्ययन करावे, एखाद्या विषयाचे कौशल्य किंवा माहिती शिकावी, पुस्तकातून लेखातून ज्ञान प्राप्त करावे समस्या सोडवून समाधानी व्हावे आणि आपले ध्येय प्राप्त करावे असे अनेक प्रश्न मना मनात निर्माण झाले.
मुख्य महत्वाचा उद्देश एकच गंथालया मधून ज्ञानगंगा विनामुल्य खळखळ वाहत रहावी. आजूबाजूच्या खेडे गावातील मुला मुलींना MPSC ,UPSC, व इतर स्पर्धा परिक्षेसाठी पैसा खर्च करुन शहरात जाणे शक्य नसते त्या मुलांचा वेळ ,श्रम , पैसा वाचवता येईल त्या साठी हा ग्रंथालयाचा प्रपंच प्रारंभ करण्याचा प्रयत्न केला.
“व्हावा अधिकारी पोर माझ्या गावचा
मानस कास्तकार पोशिंद्या माय बापाचा
मानाने सांगेल कन्या पुत्र रत्न खेड्यातला
मी विद्यार्थी मुंडगाव ग्रंथालय पादूका संस्थानचा !
विचार पक्का झाला, आणि ठरवलं
ज्ञानार्जनाचा कवडसा जरी झरोक्यातून आत आला तर प्रकाश रुपी तेजोमय उत्तुंग उन्नत ज्ञानाची कवाडे आपोआप खुली होतील आणि माझ्या मुंडगावचे बालरुपी ज्ञान संपन्न उज्वल भविष्य उंच झोक्यात व्योमी (अंतराळ , अवकाश ) फिरल्या शिवाय रहाणार नाही.
दिनांक 2 एप्रिल 14 रोजी ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माय म्हणून ओळख असणाऱ्या ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या हस्ते ” संत बायजाबाई,अद्यावत ग्रंथालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
ग्रामीण भागातील हुशार होतकरू विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक महागडी पुस्तके विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. म्हणून ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचे पुस्तके,प्रश्नसंच, सामान्य ज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान, गणित परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके, चालू घडामोडी अशा विविध विषयावरील माहिती पुस्तकांची सेवा या ग्रंथालयाने वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहे. शैक्षणिक दृष्ट्या दूर असणाऱ्या व अभ्यासात एक छान स्वतंत्र इमारत, स्पर्धा परीक्षेला उपयुक्त पुस्तके, कुलर फर्निचर व बसण्याची उत्तम व्यवस्था.पुस्तके ठेवण्याची सुविधा करण्यात आली.
गावातील व पंचक्रोशीतील जसे मुंडगावसह लामकानी, लोहारी शिरसोली, पाथर्डी इत्यादी गावातून मुलं मुली अभ्यासाकरीता नियमित ग्रंथालयात येत असतात.
गाव खेड्यातील गरीब मुलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण शांतता मिळत नाही, मुले एकाग्र होऊन अभ्यास करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, माॅक टेस्ट, आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे जावे ह्या साठी आम्ही सतत कार्यरत असतो.
ग्रंथालयाला आज 11 वर्षे पूर्ण झाली. ग्रंथालयात अभ्यास करणारे 40 ते 45 मुले मुली आपल्या अभ्यास मेहनतीने करतात तसा आमचा कटाक्ष त्यांच्यावर असतोच.आज ग्रंथालयातील मुले मुली विविध पदावर पोहोचले आहेत. परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचे ग्रंथालयाच्या प्रगती करता वेळोवेळी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य सुद्धा असते. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
ग्रंथालयाचे व्यवस्थापन दृष्टीने सर्व निर्णय गजानन महाराज पादुका संस्थेतील विश्वस्त मंडळ कार्यकारी मंडळ करतात.
खेडे गावातील मुला मुलींना एवढेच सांगू इच्छितो स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नका.
ज्ञाना तुका नामा । होता खेड्यातला।
ज्ञानार्जने झाला । महामेरु ।।
अध्ययन पठन । ग्रंथालय स्व चे ।
वेद विद्या वांचे । वदे रेडा ।।
सावित्री आनंदी । पुस्तकाचे पान ।
आत्मसात ज्ञान । ध्येयपूर्ती ।।
डॉ बाबासाहेब । अब्दुल कलाम।
विद्वत्त उद्गम । ग्रंथालयी ।।
लक्ष्य ग्रंथालया । शिक्षीता नोकरी ।
जन्माची शिदोरी । पोशिंद्याची।।
दुःख न गरिबी । भोग खेड्यातील ।
ज्ञानार्जित सोने । बावनकशी ।।


ग्रंथालय कावड । उचले विश्वस्त ।
लक्ष्मी ग्रामी गस्त । सरस्वती ।।७।।
मुलांच्या जीवनात पुर्ण तृप्ती यावी अशी इच्छा ठेवून ग्रंथालय स्थापना.
विशेष म्हणजे ग्रंथालयातील विद्यार्थी हे आपले शरीर बलवान करणारे, स्वच्छ चारित्र्य जपवणारे व,प्रयत्नांची पराकाष्टा करणारे आदर्श युवक युवती निर्माण व्हावे. त्याकरताच आम्ही ग्रंथालयातील विद्यार्थ्यांना बल,शिल,यत्न अशा आशयाचे ” ओळखपत्र दिलेले आहे.
ग्रंथालयाच्या स्थापनेकरिता मुंडगावातील बऱ्याच दानशूर भक्तांची मदत लाभली आहे.
आजचे युग हे तंत्रज्ञाना सोबत स्पर्धेचे युग आहे म्हणूनच आमचा संगणकीय ग्रंथालय बनविण्याचा प्रयत्न आहे.सर्व पदाधिकारी व सुजाण, दानशुर आप्तेष्टांच्या सहकार्याने आमचे कार्य पुर्णत्वास जाईल यात शंका नाही.
ग्रामीण मुला मुलींच्या उन्नतीसाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी ही ज्ञान ज्योत लावली आहे ती “यावच्चंद्र दिवाकरौ, तेवत राहो. अशी श्री गजानना चरणी प्रार्थना 🙏
श्री.विजय ढोरे, कोषाध्यक्ष श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव

