पुस्तकं पेरत ‘ वाचन संस्कृती ‘ वाढविणारा मास्तर
1 min read

पुस्तकं पेरत ‘ वाचन संस्कृती ‘ वाढविणारा मास्तर

Loading

पुस्तकं पेरत ‘ वाचन संस्कृती ‘ वाढविणारा मास्तर

सेवेत असतांना व सेवानिवृत्ती झाल्यानंतर ज्या मास्तरांनी तब्बल पाच लाख रुपयांची पुस्तक समाजात ‘ पेरत ‘ वाचन संस्कृती वाढावी , उत्तम वाचक निर्माण व्हावेत म्हणून गेल्या ४२ वर्षांपासून अथक प्रयत्न केले त्या मास्तरांचं नाव आहे ‘ चंद्रकांत भंडारी ‘
भंडारींच्या ग्रंथदानाला अर्थात दातृत्वाला मुहूर्तांची चौकट नाही की दातृत्वात अभिनिवेश नाही आणि व्यासपिठीय कार्यक्रमाचा सोस तर अजिबात नाही ! ‘ कल करे सो आज ‘ त्यापेक्षा ‘ अभी नही तो कभी नही ‘ म्हणजे ‘ जीवन क्षणभंगुर आहे ‘ मग ‘ कशाला उद्याची बात ? ‘ ही त्यांच्या ग्रंथदातृत्वाच्या आनंदभिधानामागील परमानंद प्राप्तीची तरल विशुद्ध संवेदनशीलता ….. बहुतांशी मंडळी वाढदिवस व विवाहाला ग्रंथदान करतात मात्र सरांनी जन्मदात्यांच्या निधनाच्या प्रसंगीही हजारो रूपयांचे ग्रंथदान केले .पुस्तकं सस्नेह भेट देत ते ‘ वाचनवाटा ‘ समृद्ध करणारे अवलीया आहेत !
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी मध्ये भंडारी यांनी १४ वर्षे शालेय विभागात ‘ शिक्षण समन्वयक ‘ म्हणून कार्य केले.त्या संस्थेच्या शालेय विभागाला भंडारी यांनी पिताश्री प्रभाकर भंडारी यांच्या स्मरणार्थ एकाच वेळी तब्बल साडेतीन लाखांची पुस्तके भेट दिली ! विशेष म्हणजे कोणताही कार्यक्रम आयोजित न करता व दोन ओळींची सुद्धा बातमी न देता !
वाचनामुळे वैचारिक पातळी , सृजनशीलता यांसह एकाग्रता , शब्दसंपदा , स्मरणशक्ती , सहानुभूती यात वाढ होते .संवाद कौशल्ये व नातेसंबंधात सुधारणा होते त्या वाचनासंबंधी भंडारी म्हणतात , ‘ मी आजतागायत एकूण १५ पुस्तकं लिहिली त्यांच्या एकूण ४००० प्रती मी शिक्षक , पालक , विद्यार्थी , शिक्षण संस्था , नातेवाईक यांना आदरपूर्वक सस्नेह भेट म्हणून दिल्या .
ज्या ज्या समारंभांना , कार्यक्रमांना मी जातो तिथे मी नेहमीच पुस्तके भेट देतो . त्यांच्या खांद्याला नेहमी स्वलिखित पुस्तकांची भरलेली शबनम असते. ग्रंथदानासाठी त्यांना नेहमी धर्मपत्नी सुनीता भंडारी यांचे प्रोत्साहन व सुपूत्र हर्षवर्धन तसेच स्नुषा तेजश्री यांचे अमूल्य सहकार्य मिळते .
वाचकांचा वयोगट व आवड बघून भंडारी पुस्तके भेट देतात .भंडारी यांच्याकडे आजही जवळपास चार लाख रुपयांची विविध विषयांवरील दर्जेदार लेखक व प्रकाशनांची त्याचप्रमाणे हिंदी , इंग्रजी , संस्कृत व अन्य प्रादेशिक भाषेतील विपुल ग्रंथसंपदा संग्रही आहे.
‘ काय वाचावं ? व का वाचावं ‘ यासंबंधी शेकडो व्याख्याने भंडारी यांनी दिली आहेत .यापुढे वाचन संस्कृती वाढावी म्हणून पुस्तक निरंतर भेट देण्याची इच्छा त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद करतांना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *